भाज्यांच्या किमतीत ६३.०४ टक्के वाढ; घाऊके महागाई दर चार महिन्यातील उच्चांकी स्तरावर
खाद्यान्न महागाई १३.५४ टक्के असून, भाज्यांच्या किंमतींचा ६३.०४ टक्क्यांवरचा वाढ हा आकडेवारीतील सर्वाधिक चिंताजनक मुद्दा आहे.
नवी दिल्ली : खाद्यपदार्थ, विशेषतः भाज्या आणि प्रक्रिया खाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील घाऊक महागाई दर सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात २.३६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे गुरुवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत नमूद केले आहे. खाद्यान्न महागाई १३.५४ टक्क्यांवर असून, त्यात भाज्यांच्या किंमत वाढीचा ६३.०४ टक्क्यांवर असलेला भडका हा आकडेवारीतील अत्यंत चिंताजनक मुद्दा आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात वाढला आहे आणि तो आता गेल्या चार महिन्यातील सर्वोच्च स्तरावर गेला असल्याचे नवीन आकडेवारी दर्शविते. जून २०२४ मध्ये त्याने ३.४३ टका म्हणून चालू वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये हा दर १.८४ टक्के होता, तर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तो उणे (-) ०.२६ टक्के पातळीवर होता.
आकडेवारीच्या नुसार, ऑक्टोबरमध्ये अन्न वस्तूंतील महागाई १३.५४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, जी सप्टेंबरमध्ये ११.५३ टक्के होती. सप्टेंबरमध्ये ४८.७३ टक्के असलेल्या भाज्या महागाईचा दर ६३.०४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात बटाटे आणि कांद्याचे दर अनुक्रमे ७८.७३ टक्के आणि ३९.२५ टक्के वाढले. दुसरीकडे, इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील घटकांमध्ये ऑक्टोबरमध्ये ५.७९ टक्के घट झाली, सप्टेंबरमध्येही त्यात ४.०५ टक्के कमी झाली होती. ऑक्टोबरमध्ये उत्पादित वस्तूंच्या महागाईचा दर १.५० टक्के होता, मागील महिन्यात हा दर १ टक्क्यांवरच होता.
ऑक्टोबर २०२४ मधील महागाई मुख्यतः खाद्यपदार्थांच्या किमती, तयार खाद्य उत्पादने, इतर वस्तू, यांत्रिक उपकरणे आणि साधनांच्या उत्पादनामुळे, मोटार वाहनांचे उत्पादन आणि ट्रेलरच्या उत्पादन घटकांमधील वाढलेल्या किमतींमुळे आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले.
खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाल्याने नाशिवंत असलेल्या, विशेषतः भाज्यांच्या, किरकोळ आणि घाऊक किमतीत वाढ होत आहे. उत्पादित वस्तूंच्या किमती किंचित वाढल्या आहेत, यामागे मुख्यत्वे धातूंच्या किमतीतील वाढ कारणीभूत आहे, असे मत बार्कलेजच्या अर्थतज्ज्ञ श्रेया शोधनी यांनी व्यक्त केले.
अनेक अन्नधान्यांच्या खरीप उत्पादनात अपेक्षित मोठ्या वाढीमुळे आणि वाढलेल्या जलसाठ्याच्या पातळीमुळे रब्बी पिकांसाठी संतोषजनक हंगाम राहण्याची शक्यता आहे. हे नजीकच्या काळात अन्नधान्य घटकांमधील घाऊक किंमत कमी होण्याबाबत चांगले संकेत देत आहेत. केवळ जागतिक पातळीवरील प्रतिकूल घटनांमुळे आयात होणाऱ्या वस्तू आणि खनिज तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असं इक्राचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल यांनी सांगितलं.
व्याजदर कपात एप्रिल २०२५ नंतरच
रिझर्व्ह बॅंकेच्या प्रयत्नांनंतरही महागाईवर नियंत्रण येत नसल्याचे दिसते, उलट ती अधिक वाढत असल्याचे स्पष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई दर (चलनवाढ) ६.२१ टक्के एवढा असून, हा १४ महिन्यांचा सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या लक्ष्य-पातळीच्या तुलनेत अत्यधिक चलनवाढीने पातळी गाठल्यामुळे, डिसेंबरमध्ये सलग ११ व्या द्विमाही पतधोरण बैठकीत व्याजदरात कोणतीही बदल न करण्याचा निर्णय घेईल. महागाई वाढल्यामुळे एप्रिल २०२५ नंतरच व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्लेषकांनी दिली आहे.
हेही वाचा >>> IND vs SA 3rd T20 Highlights
0 टिप्पणियाँ